खुशखबर! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

आपला जिल्हा

जनशक्ती ( वृत्तसेवा)- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. ६० प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रविवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. विमान दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांचा बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केले. २०१८ साली शिर्डीत विमानतळ झाल्यानंतर आजतागायत हजारो प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेतला आहे. शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाल्याने साईभक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. ही सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावर पहिल्याच विमानाने येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत पुष्प, साईबाबांचा प्रसाद देऊन तसेच केक कापून करण्यात आले.दरम्यान, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा निर्माण करण्यासह विमानसंख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.