बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात २ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला असून त्यानिमित्त बक्षिस म्हणून सोन्याची नथ तसेच कुलर, मिक्सर आणि खास लोटस पैठणी ३१ नग तसेच कार्यक्रम संपल्यानंतर महिलांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी गंगेचे पाणी घेवून आलेल्या कावडींची मिरवणूक होईल आणि वाजत गाजत देवीमातेला जलाभिषेक होईल. तसेच संपूर्ण दिवसभर प्रत्येक कुटुंब देवीला वाजत गाजत नैवैदय अर्पण करुन पारंपरिक पद्धतीने पूजा होईल. रात्री ७ ते ८ या वेळेत देवीचा छबीना मिरवणूक होईल. त्यानंतर रात्री ८ ते ११ या वेळेत तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवालीकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा अंतिम दिवस म्हणजे ४ जानेवारी हा अतिशय महत्वाचा म्हणजे कुस्त्यांचे जंगी मैदान या दिवशी भरणार आहे. या कार्यक्रमासाठी माका आणि पंचक्रोशित इतिहासात प्रथमच दोन महाराष्ट्र केसरी पहिलवानांच्या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रथम आणि द्वितीय बक्षिसे एक लाख एक्कावन्न हजार रुपये असणार आहे. त्याचबरोबर इतर राज्यातील अनेक नामवंत मल्ल याठिकाणी येणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला व पुरुष कुस्तीपटूतसेच संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील नामवंत पहिलवानांचा जंगी हंगामा होवून यात्रेची सांगता होणार आहे. सदर यात्रा महोत्सवाचा ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी गावातील
अनेक देणगीदार, तसेच व्यावसायिक, ग्रामस्थ, ग्रामपंचायत माका, सेवा सोसायटी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हा. चेअरमन, सर्व सदस्य व सर्व संचालक विशेष परिश्रम घेत आहेत.



