जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड येथे शाळेच्या प्रांगणात आज सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ, नावागतांचे स्वागत व गुणवंतांचा सन्मान हा कार्यक्रम अत्यंत उत्साही, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. भावनांनी ओथंबलेल्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आठवड ग्रामपंचायतचे उपसरपंच शंकर मोरे होते. यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी, पोलीस दलातील शमुवेल सदानंद गायकवाड (पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा अहिल्यानगर), प्रमुख वक्ते अभिषेक अर्जुन घटमाळ (आदर्श शिक्षक, नेवासा), सविताताई लगड (सरपंच आठवड), सुनील लगड सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब गाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिपक लगड, बी.एस. लगड, विठोबा लगड, शिवप्रसाद लगड, बाळासाहेब लगड, शाळेचे मुख्याध्यापक संदिप वाघमारे, गोरख वाबळे, अजय भद्रे, प्रमिला साठे, सारिका मोरे, वाटाडे मॅडम, सुनंदा मोरे, स्वाती मोरे, अलका मोरे, प्रवीण मोरे, सुनील चोभे, गणेश मोरे, जनसेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे, सचिन लगड, कांबळे मेजर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा परिचय शाळेतील शिक्षिका प्रमिला साठे मॅडम यांनी करुन दिला. यावेळी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाऊलांचे ठसे घेण्यात आले, त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सातवीच्या विद्यार्थ्यांनी ही शाळेतील वाचनालयाकरिता पुस्तके भेट म्हणून दिली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आदर भाव व्यक्त करून आपल्या भावनांना वाट मोकळी केली. यावेळी प्रास्ताविकात संदीप वाघमारे म्हणाले की, आपली शाळा ही एक चांगली शाळा असून ग्रामस्थांचे शाळेला नेहमीच सहकार्य मिळत असते. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे शिक्षक देखील विद्यार्थी घडवण्याचे काम करतात. शिक्षक ज्यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षा करतात, रागवतात हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचे असते. सातवीच्या विद्यार्थ्यांचा अध्ययन व अध्यापन करण्याचा दोन वर्षापासून माझ्याशी संपर्क आहे. निश्चितच हे विद्यार्थी यशाचे उंच शिखर गाठतील याचा मला आत्मविश्वास आहे. आठवड सरपंच सविताताई लगड यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. सुनील लगड यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले. विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. या शाळेतून जरी तुम्ही गेलात तरी शाळेविषयी गुरुजनांविषयी विद्यार्थ्यांनी नेहमी आदरभाव बाळगावा. शिक्षक गोरख वाबळे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गायकवाड साहेब यांनी आपल्या भाषणांमधून बोलताना विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. पालकांनीही आपल्या मुलांना १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत गाडी चालवण्यास देऊ नये असे निक्षून सांगितले. प्रमुख वक्ते अभिषेक घटमाळ यांनी बासरी वादनाने आपल्या व्याख्यानाची सुरुवात केली, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. पुढे ते म्हणाले की, इयत्ता सातवी हा प्राथमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील केवळ एक वर्ग नाही, तर आयुष्याला कलाटणी देणारा निर्णायक क्षण आहे. याच टप्प्यावरून विद्यार्थ्यांची स्वप्न आकार घेतात, दिशा ठरते आणि ध्येय स्पष्ट होतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनतीचे, जिद्दीचे आणि कोणत्याही संकटाशी दोन हात करणारे असतात. अभ्यास, चिकाटी आणि चांगल्या संस्काराच्या बळावर हेच विद्यार्थी उद्या मोठमोठ्या यशाची शिखर गाठतील. यावर माझा ठाम विश्वास आहे. पुढे बोलताना म्हणाले की, विद्यार्थी घडविण्याचे कार्य म्हणजे देवकार्य आहे. आई जन्म देते, पण शिक्षक आयुष्य घडवितात. म्हणूनच आपल्या संस्कृतीत आई नंतर गुरूंना सर्वोच्च स्थान दिले जाते. शिक्षक आपले संपूर्ण आयुष्य, ज्ञान, अनुभव आणि माया विद्यार्थ्यासाठी अर्पण करतात. त्यामुळेच समाज घडतो. पिढ्या घडतात. निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात स्वप्न होती, तर गुरूंच्या डोळ्यांत समाधान, अभिमान आणि आपुलकी होती.
कार्यक्रमानंतर सर्वांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे आभार वाबळे सर यांनी मानले. हा सोहळा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तो होता गुरुप्रती अपार कृतज्ञता. अशाप्रकारे निरोप समारंभ भावनिक अशा वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी अंगणवाडी सेविकांनी “बालविवाह मुक्त भारत” प्रतिज्ञा घेतली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अजय भद्रे यांनी केले.

