जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फुले व टाळ्यांच्या गजरात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शालेय साहित्याचा लाभ मिळावा, यासाठी पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांना शालेय जीवनाविषयी माहिती देण्यात आली. तसेच नियमित उपस्थिती, स्वच्छता व अभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून हभप सुखदेव महाराज मुंगसे, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, सरपंच चंद्रकांत मुंगसे, छत्रपती प्रतिष्ठानचे मच्छिंद्र मुंगसे, आदिनाथ कुटे, भाऊसाहेब मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, अमोल बनसोडे, हरिभाऊ लोखंडे, हरिभाऊ शेळके, विनोद शिंदे आदी उपस्थित होते.
तसेच संभाजी कडू, मदन लाड, संध्या मुंगसे, सुवर्णा जाधव, सुवर्णा काळे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. उपस्थित पत्रकार युनूस पठाण यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक सतीश भोसले सर व सहशिक्षकांनी केले. उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.