जनशक्ती (वृत्तसेवा)- आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. या भक्तिसागरानंतर पवित्र क्षेत्र स्वच्छ व निर्मळ ठेवण्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारत यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई (ता. नेवासा) येथील स्वयंसेवकांनी मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली “वारी स्वच्छतेची, वारी भक्तीची” या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, या स्वच्छता वारीचे यंदाचे सलग पाचवे वर्ष ठरले आहे.
“स्वच्छता हीच खरी सेवा आणि सेवेतच ईश्वराचे दर्शन” या भावनेतून स्वयंसेवकांनी पंढरपूर परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. वारीनंतर निर्माण झालेला कचरा, निर्माल्य आणि इतर टाकाऊ वस्तू हटवून पवित्र भूमी स्वच्छ ठेवण्यासाठी स्वयंसेवकांनी मनापासून श्रमदान केले. या उपक्रमामुळे भाविकांसह स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांद्वारे सातत्याने समाजहिताचे कार्य करत आहे. या स्वच्छता अभियानातून केवळ परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेशच नव्हे, तर तरुणांमध्ये सेवाभाव, सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.
या प्रसंगी पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांनी या उपक्रमाला आवर्जून भेट देऊन यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई मा मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ पंढरपूर घडविण्यासाठी यशवंतच्या स्वयंसेवकांनी दिलेले हे योगदान प्रेरणादायी असून, अशा उपक्रमांमधून सामाजिक सेवेला नवी दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
पंढरीच्या स्वच्छता मोहिमेत सहभागाचे भाग्य लाभते
वारी स्वच्छता उपक्रमात सहभागी होऊन पंढरपूरची स्वच्छता करण्याचे भाग्य यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांना लाभते यांचा मनस्वी आनंद आहे. प्रत्येक वर्षी तरुणांनी वारी स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हावे व पंढरपूर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास आपला हातभार लावावा.
– उदयन गडाख
उपाध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई.


