कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्याल माका येथे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात

आपला जिल्हा
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तथा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती-पुण्यतिथी विभागाचे समन्वयक शहाबाज सय्यद यांनी केले. त्यांनी ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन, चिंतन आणि लेखनाची सवय जोपासावी, असे आवाहन केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतींचे अभिवाचन केले. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्याविषयी मनोगते व्यक्त करत लेखन-वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रतिक्षा लोंढे हिने आपल्या मनोगतात लोकमान्य टिळक यांच्या “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या घोषवाक्याचा उल्लेख करून आजच्या काळातही प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्यांविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी केवळ औपचारिकरीत्या साजऱ्या न करता त्यांचे चरित्र वाचून त्यांचे विचार जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत तिने व्यक्त केले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यविश्वातील मोलाच्या योगदानाचा आढावा घेत त्यांच्या ‘फकीरा’ या गाजलेल्या कादंबरीची विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती दिली.
शिक्षक प्रतिनिधी पुंड यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण वाचन, चिंतन आणि लेखनाची सवय लावण्याचे आवाहन केले. “मोठे व्हायचे असेल तर प्रथम भरपूर वाचा, विचार करा आणि सातत्याने लिहा. परिश्रमाशिवाय यश प्राप्त होत नाही. लेखन ही विचारांना दिशा देणारी आणि व्यक्तिमत्त्व घडविणारी प्रभावी साधना आहे,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रभाव होता, असे त्यांनी नमूद केले. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याने प्रेरित होऊन अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीतही उल्लेखनीय योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. ‘लेखन प्रेरणा दिना’निमित्त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, शिक्षणप्रेम आणि लोकजागृतीच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. टिळकांचे विचार आजही तरुण पिढीला राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देणारे आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याचा प्रभावी आढावा घेत ‘फकीरा’ आणि ‘स्मशानातील सोनं’ या साहित्यकृतींतील संघर्ष, सामाजिक न्याय आणि मानवी मूल्ये अधोरेखित करणारे प्रसंग विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाच्या मर्यादित संधी असूनही अण्णाभाऊ साठे यांनी जिद्द, परिश्रम आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर साहित्यविश्वात अढळ स्थान निर्माण केले, असे त्यांनी नमूद केले.
रशिया दौऱ्यात अण्णाभाऊ साठे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करून मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव केला, हा प्रेरणादायी संदर्भही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल दहातोंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल दरंदले यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘लेखन प्रेरणा दिन’ प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि विचारप्रवर्तक वातावरणात संपन्न झाला.