बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत नामदेव महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पावन संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ४० वर्षाच्या परंपरेनुसार बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने व महंत भास्करगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, हभप मीराबाई महाराज मिरीकर व हभप सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली तांबे वस्ती येथील संत सावता महाराज सभामंडपात अखंड हरीनाम सप्ताहास ५ ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. या सप्ताहाच्या प्रारंभी श्रींच्या प्रतिमेचे पूजन, हरिपाठ, भजन व नामसंकीर्तनाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.
सप्ताहाच्या कालावधीत दररोज काकडा आरती, हरिपाठ, भजन व नामांकित महाराजांची किर्तने होणार आहेत. किर्तनामध्ये हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप हरिभाऊ महाराज भोंदे, गुरुवर्य देविदास महाराज म्हस्के, गुरुवर्य अर्जुन महाराज तनपुरे, हभप रवींद्र महाराज मोटे, हभप नंदकिशोर महाराज खरात, गुरुवर्य रामगिरी महाराज येळीकर यांची किर्तनरुपी सेवा दररोज असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर ११ आॅगस्ट रोजी भव्य मिरवणूक सोहळा होईल. तर १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ वेळेत हभप स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, श्री संत सावता युवा प्रतिष्ठान या आयोजकांकडून करण्यात आले आहे. संत नामदेव महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यभर अनेक ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे.


