बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- “शालेय जीवनापासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली, तर आपल्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार मिळतो. या परीक्षांच्या अभ्यासाच्या पद्धतीमुळे शिस्त लागून भविष्यात येणाऱ्या एमपीएससी किंवा यूपीएससीसारख्या परीक्षा सहज उत्तीर्ण करता येतात. थोडक्यात, स्पर्धा परीक्षांमुळेच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर घडते,” असे प्रतिपादन प्राजक्ता संजय कचरे यांनी केले.
तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी प्राजक्ता कचरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी संजय कदम होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष संजय कदम म्हणाले, “शालेय वयापासून स्पर्धा परीक्षांची पायाभरणी केली, तर यश निश्चित मिळते आणि व्यासपीठावरील यशस्वी मान्यवर हेच याचे जिवंत उदाहरण आहेत.”
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सब-रजिस्ट्रार ग्रेड-१, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक (STI) या तिन्ही पदांवर दैदिप्यमान यश मिळवल्याबद्दल कुमारी प्राजक्ता संजय कचरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, MPSC मार्फत STI पद प्राप्त केल्याबद्दल श्री. राजेंद्र आठरे यांचाही गौरव करण्यात आला.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सह्याद्री रत्न पुरस्कार’ प्राप्त झालेल्या आकांक्षा तांबे यांचा तक्षशिला परिवाराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र आठरे म्हणाले, “प्राध्यापक विजय कदम सर यांच्याकडे पाहून मला अभ्यासाची खरी प्रेरणा मिळाली. अनेक विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात शिकत आहेत, ही त्यांच्यासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे.”
प्राचार्य विठ्ठल कदम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी या यशस्वी व्यक्तींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कष्ट, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर आपले ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील शंका व प्रश्न मांडले, ज्याची उत्तरे मान्यवरांनी अत्यंत दिलखुलासपणे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विठ्ठल कदम यांनी केले, सूत्रसंचालन श्रुतिका उगले यांनी तर उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉक्टर विजय कदम यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी संचालिका शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, उपप्राचार्य मयुरी आढाव, अभय कचरे, महादेव मुंगसे, विनोद डमाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

