बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी प्राचार्य, सहाय्यक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध भूमिका प्रत्यक्ष साकारत अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये जाऊन अध्यापनाचे कार्य केल्याने कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनासाठी शिक्षकांचा आदर करून त्यांच्याकडून मिळणारे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. मिसाळ म्हणाले की, समाजात शिक्षकाला मानाचे व आदराचे स्थान आहे. शिक्षकाने अभ्यासपूर्ण अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. ‘गुरु’ आणि ‘शिक्षक’ यांतील फरक स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
प्रा. शाहिदास काळे यांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर करून अभ्यासाला प्राधान्य द्यावे, असे सांगितले. ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देणारे प्रभावी साधन असून, विद्यार्थ्यांनी ज्ञानमंदिरात येऊन सातत्याने ज्ञानार्जन करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. ज्ञानेश्वर पादर यांनी ज्ञानमंदिराचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सतत नवीन ज्ञान मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे. स्वामी विवेकानंद, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली. त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. मदन सोनवणे यांनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचे मनोगत व्यक्त केले. शिक्षक-विद्यार्थी नाते, अध्यापनातील शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षक दिनानिमित्त आयोजित विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. काही विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची भूमिका, तर काहींनी सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विविध विषयांचे अध्यापन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्यपद्धतीची, जबाबदाऱ्यांची आणि अध्यापन प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. वाय. बी. एस्सी. विद्यार्थिनी सानिया शेख हिने केले. सूत्रसंचालन एस. वाय. बी. एस्सी. विद्यार्थिनी वैष्णवी बोरुडे हिने केले, तर आभार टी. वाय. बी. ए. विद्यार्थी राम लोंढे यांनी मानले.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

