जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- अहिल्यानगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आठवड येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात हा सुंदर कार्यक्रम पार पडला. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली. चिमुकल्या विद्यार्थीनी शिक्षकांनी साडी नेसून, हातात पुस्तक आणि फुल घेऊन आत्मविश्वासाने शिकविण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी साकारलेली ही छोट्या शिक्षकांची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. नवजीवन फाउंडेशन चे अतुल बडदे यांनी सर्व विद्यार्थी शिक्षकांचे पाठांचे निरीक्षण करून विद्यार्थी शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी सर्व आदरणीय गुरुजनांचा सत्कार केला. शिक्षकांनी देखील आपले चिमुकले विद्यार्थी शिक्षक यांना सन्मान देऊन त्यांचा सत्कार केला. विद्यार्थी शिक्षकांनी अध्ययन व अध्यापनाचे अतिशय उत्कृष्टपणे कामकाज केले. यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त केला. सर्वांनी थोर शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षकांविषयी असलेले विचार व्यक्त केले. यावेळी अतुल सरांनी आपल्या भाषणात सांगितले की, जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच खरे हिरे घडतात, आजचे हे विद्यार्थी शिक्षकच उद्याचे खरे आदर्श शिक्षक होतील. सर्व विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेल्या संस्काराचे विशेष कौतुक केले. गुरु हा केवळ शिकवणारा नसतो तर घडवणारा असतो, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या
जयंतीनिमित्त साजरा होतो. डॉ. राधाकृष्णन हे एक महान शिक्षक, तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांनी नेहमी सांगितले की, शिक्षक हा देशाचा खरा शिल्पकार आहे. डॉ. राधाकृष्णन म्हणायचे, माझा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा, हाच माझा गौरव आहे. आजच्या डिजिटल युगातही शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. छत्रपती शिवरायांना घडवण्यात जिजाऊ आणि गुरु दादोजी कोंडदेव यांचा मोठा वाटा होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि वक्तृत्व कला विकसित होण्यास मदत झाली आहे. पालकांनी देखील या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा देखील शहरातील शाळांच्या बरोबरीने कसे उपक्रम राबवतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आठवड शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. शिक्षक दिनाचा खरा अर्थ या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि माता पालक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यात असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा मानस शाळेने व्यक्त केला आहे. खऱ्या अर्थाने गुरु शिष्याच्या नात्याला उजाळा देणारा हा कार्यक्रम ठरला. अशा उपक्रमातूनच उद्याचे सुसंस्कृत आणि शिक्षित भारत घडेल, असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक श्री. संदीप वाघमारे सर यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील शिक्षक श्री. गोरख वाबळे सर, श्री. अजय भद्रे सर व श्रीम. प्रमिला साठे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. या वेळी विद्यार्थ्यांकरिता मिष्ठान्न भोजन लापशी, सांबर भात देण्यात आले.