सोनई (प्रतिनिधी)- सोनई परिसरासह नेवासा तालुक्यात व अहिल्यानगर जिल्ह्यात सामाजिक,शैक्षणिक, संस्कृतीक ,क्रीडा ,धार्मिक, आरोग्य, ग्रामविकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनई यांच्या वतीने सन 2002 पासून सोनई व परिसराच्या विकासात विविध माध्यमातून कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांना नवरात्र महोत्सवात सोनईरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते.
माजी खासदार यशवंतराव गडाख साहेब यांच्या प्रेरणेने व
माजी मंत्री शंकरराव गडाख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६ चे सोनईरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सोनई परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी असणारे ज्येष्ठ नागरिक मंचच्या माध्यमातून
विविध उपक्रम राबवणारे शिवाशेठ बाफना यांना जाहीर करण्यात आला. तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून
सोनई परिसरासाठी योगदान देणाऱ्या व सध्या हयात नसलेल्या व्यक्तींना मरणोत्तर सोनईरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये स्व. रामचंद्र(भाऊ) शेटे, स्व. मुरलीधर (आप्पा)बोरुडे, स्व. रामचंद्र उर्फ दादा वाघ (ड्रायव्हर) यांना जाहीर करण्यात आला असून
पुरस्कार निवडीचे पत्र यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे
उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या घरी पुरस्कार निमंत्रणाचे पत्र प्रतिष्ठानच्या सदस्यासह पोहोच केले.
सोमवारी (ता. १९) सायंकाळी ६ वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या शुभहस्ते व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
तरी याप्रसंगी सोनई व परिसरातील, नेवासा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी केले आहे.

