कोजागिरी पौर्णिमेला मोहटादेवी गडावर भाविकांची अलोट गर्दी

आपला जिल्हा

पाथर्डी ( प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता आणि कोजागिरी पौर्णिमेच्या पर्वानिमित्त श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर भाविकांची अलोट गर्दी उसळली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. नवरात्रोत्सवात दर्शनासाठी येऊ न शकलेले भाविक, दर महिन्याला पौर्णिमेची वारी करणारे भक्त आणि नवसपूर्तीसाठी आलेल्या महिला भाविकांमुळे संपूर्ण गड भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. गडाकडे जाणारे रस्ते आणि पायऱ्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या असतानाही देवस्थान प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे दर्शन व वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिली.कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोहटादेवी गडावर पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गडावर वाहनांची संख्या वाढल्याने गर्दीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, देवस्थान विश्वस्त मंडळ आणि सुरक्षा रक्षकांनी वाहनांच्या पार्किंगचे नियोजन केल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी येताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला नाही. जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहनतळाचे नियोजन आणि सुलभ दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.
मोहटादेवीवरील श्रद्धेपोटी अनेक महिला भाविक मनोकामना पूर्ण झाल्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला देवीच्या चरणी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याचा नवस फेडतात. नऊ सुवासिनींना गडावर आणून त्यांना मानाने भोजन देण्याची परंपरा अनेक भाविकांकडून जपली जाते. मनोकामना पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून महिला भाविक नऊ सुवासिनींसह गडावर दाखल झाल्या होत्या. या धार्मिक परंपरेमुळे पौर्णिमेच्या दिवशी महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून पुणे येथील भाविक आनंद दळवी यांच्या वतीने देवीच्या मुख्य गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या सजावटीमुळे मंदिराच्या गाभाऱ्याला विशेष धार्मिक व प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले होते.
शारदीय नवरात्रोत्सवात मोहटादेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक गडावर येतात. नवरात्रोत्सवाची सांगता कोजागिरी पौर्णिमेला करताना देवीची दृष्ट काढण्याची परंपरा आहे. पौरोहित्यांच्या मंत्रोच्चारात मीठ-मोहरीने देवीची दृष्ट काढण्याचा धार्मिक विधी करण्यात आला. या विधीला विशेष महत्त्व असून, नवरात्रोत्सवातील गर्दी आणि उत्सवानंतर देवीची दृष्ट काढून उत्सवाची सांगता केली जाते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवीला विशेष नैवेद्य अर्पण करण्यात आला. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ आणि साखर घालून तयार केलेल्या मसाला दुधाचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा या दिवशी पाळली जाते. आश्विन शुक्ल पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता देवीच्या महाआरतीने करण्यात आली. रात्रीच्या वेळी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करता आले.दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी स्वागत केले.