तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रम

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने, येथील तक्षशिला ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अहिल्यानगर यांचेवतीने कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


​या कार्यक्रमासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात बोराडे यांनी शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी नवीन कृषी तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. ​त्यांनी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी विकसित केलेल्या ‘महाविस्तार’ कृषी ए आय या अत्यंत महत्त्वाच्या मोबाईल “अ‍ॅप्लिकेशनची सविस्तर माहिती दिली. “या ॲपद्वारे पिकांवरील कीड, रोग नियंत्रण व उपाय, हंगामानुसार पिकांची निवड आणि विविध शासकीय योजनांची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होते,” असे सांगत त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना हे ॲप तातडीने मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याचे आवाहन केले.
या ​कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी विज्ञान केंद्र दहिगाव-ने येथील शास्रज्ञ् शामसुंदर कौशिक, तसेच सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘महाविस्तार’ कृषी ए आय ॲप डाउनलोड करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवली.
अ‍ॅप्लिकेशनमधील विविध सेवा आणि त्याचे कृषी क्षेत्रातील प्रत्यक्ष फायदे सोप्या भाषेत समजावून सांगितले. यावेळी, कृषी विभागातर्फे या ॲपचा सर्वाधिक वापर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्याची घोषणा करण्यात आली.
​यावेळी विद्यार्थ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना कृषी तंत्रज्ञान आणि ॲपच्या वापराबाबत उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले, ज्यांची समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तक्षशिला विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल कदम हे होते. उपप्राचार्य मयुरी पवार, शिक्षक अशोक पवार, गणेश नांगरे, पुनम चिमखडे,साक्षी गायकवाड यांच्या सह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रो. डॉ. विजय कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
​या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक कृषी क्षेत्राविषयी जागृती निर्माण झाली असून, त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे भविष्य उज्ज्वल करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल कृषी अधिकारी श्री संजय कदम यांनी सर्वांचे आभार मानले.