बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- “शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर ती जीवन जगण्याची कला आहे. विद्यार्थ्यांना शालेय वयातच व्यवसायाचे प्रत्यक्ष धडे मिळाले, तर ते भविष्यात निश्चितच मोठे उद्योजक बनू शकतील,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी केले.
तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित ‘इग्नाइट फेस्ट’ या बाल उद्यम उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रो. डॉ. विजय कदम होते. यावेळी प्रख्यात कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज तांबे, सुखदेव महाराज मुंगसे आणि बाळासाहेब महाराज गडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि व्यवसायाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘इग्नाइट फेस्ट’ उपक्रम राबवण्यात आला. ‘विकसित उद्यम – विकसित राष्ट्र’ ही या महोत्सवाची मुख्य संकल्पना (थीम) आहे.
या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू तयार करण्यापासून ते त्यांच्या विक्रीपर्यंतच्या व्यवस्थापनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी चविष्ट खाद्यपदार्थ बनवून विक्रीचे कसब दाखवले. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठेत कसे विकावे, याचे प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजी बाजार भरवला होता.
मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांनी कल्पक खेळांचे स्टॉल्स लावले होते. या महोत्सवात एकूण १०० हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, दिवसभरात विद्यार्थ्यांनी सुमारे १.५ लाख रुपयांची विक्री करून आपल्या व्यावसायिक कौशल्याची चुणूक दाखवली. परिसरातील नागरिक आणि पालकांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, मयुरी आढाव, समन्वयक कल्पना पवार आणि संचालिका शुभांगी कदम यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रगत शेतकरी दत्तात्रय शिंदे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय पवार, कृषी अधिकारी संजय कदम, डॉ. भागवत वेताळ, अरुण वांढेकर, पत्रकार इंनुस पठाण, बापूसाहेब म्हस्के आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.


