माका येथे शृंगऋषिगडाच्या नारळी सप्ताहाचे धर्मध्वजारोहन उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथे पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र श्री शृंगऋषिगडाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी माका येथे आयोजित करण्यात येणाऱ्या द्वितीय ‘अखंड हरिनाम नारळी सप्ताहाचा’ ध्वज उभारणी सोहळा गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, गोवत्स गुरुवर्य राधाकृष्ण स्वामी महाराज, गुरुवर्य आदिनाथ महाराज शास्त्री, महंत जनार्धन स्वामी महाराज व विविध संत आणि महंतांच्या शुभहस्ते व हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी टाळ मृदुंगाच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजी मध्ये व सजावट केलेल्या रथामध्ये संत-महंतांची यथोचित मिरवणूक काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी त्यांचे औक्षण व सन्मान करण्यात आले. या मिरवणुकीने परिसराचे लक्ष वेधून घेतले होते.
या मंगल प्रसंगी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भक्तीपूर्ण वातावरणात विधिवत पूजाअर्चा करून हा पवित्र ध्वज उभारण्यात आला. यावेळी उपस्थित संत-महंतांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना सप्ताहाचे आणि नामस्मरणाचे महत्त्व विशद करत आशीर्वाद दिले.
या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पुढील 24 एप्रिल पासून सात दिवस माका येथे विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पहाटेची काकड आरती, श्री गणेश महाराज वारंगे यांची श्रीमद् भागवत कथा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. तसेच ज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत ग्रंथराज पारायण, गाथा भजन, नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तने व प्रवचने,हरिजागर अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहणाच्या या सोहळ्यामुळे संपूर्ण माका आणि परिसरातील गावांमध्ये भक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सप्ताहाच्या काळात दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदानाचे आयोजित केले असून परिसरातील सर्व भाविकांनी या धार्मिक सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी होऊन दर्शन, कीर्तनश्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शृंगऋषिगड संस्थानचे गुरुवर्य महंत सुरेशानंद महाराज यांनी व सप्ताह समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.