बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ”कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असल्यास कठोर परिश्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये ‘शॉर्टकट’ नसतो; तर सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनत हाच यशाचा खरा पाया आहे,” असे प्रतिपादन नवनियुक्त सेल टॅक्स इन्स्पेक्टर राजेंद्र आठरे यांनी केले.
तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना आठरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी संजय कदम उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात संजय कदम म्हणाले, “शालेय वयापासूनच स्पर्धा परीक्षांची योग्य पायाभरणी केली, तर भविष्यात यश निश्चित मिळते. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले यशस्वी व्यक्तिमत्त्व हेच याचे जिवंत उदाहरण आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत सब-रजिस्ट्रार पदी निवड झाल्याबद्दल कु. प्राजक्ता संजय कचरे आणि सेल टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र आठरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यासोबतच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘सह्याद्री रत्न पुरस्कार’ प्राप्त आकांक्षा तांबे यांचाही तक्षशिला परिवाराच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र आठरे पुढे म्हणाले की, “प्राध्यापक विजय कदम सर यांच्याकडूनच मला अभ्यासाची खरी प्रेरणा मिळाली. या शैक्षणिक संकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कदम सरांचे मार्गदर्शन ही खूप मोठी जमेची बाजू आहे.”
प्राचार्य विठ्ठल कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांनी या यशस्वी व्यक्तींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जिद्द, कष्ट आणि सातत्याच्या जोरावर आपले ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी मान्यवरांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले, ज्याला मान्यवरांनी दिलखुलास उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम यांचे मार्गदर्शन लाभले. या सोहळ्यास संचालिका शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, उपप्राचार्य संदीप खाटीक, मयुरी आढाव, अभय कचरे, महादेव मुंगसे, विनोद डमाळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका उगले यांनी केले, तर उपप्राचार्य संदीप खाटीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

