बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवी वस्ती येथे रेणुका माता देवीच्या उत्सवाला विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. जय भवानी युवा ग्रुप देवी वस्तीच्या वतीने श्री क्षेत्र मोहटादेवी येथून ज्योत आणण्यात आली. ज्योतीचे गावात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. परंपरेनुसार रविवारी घटस्थापना करण्यात आली. उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली असून, परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
रेणुका माता उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी काकडा,दररोज सायंकाळी 4 ते 5 या वेळेत हभप रामायणाचार्य बबन महाराज पाटेकर यांची देवी कथा भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे. दररोज सकाळी व सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाच्या माध्यमातून भाविकांना धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा संदेश दिला जात आहे. उत्सव काळात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये ग्रामस्थ व भाविक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत. श्री रेणुका माता देवीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, उत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व उत्सव समितीच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे.
परिसरामध्ये मंदिरासाठी विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. दररोज सायंकाळी फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी पुजारी जगन्नाथ शेटे, जय भवानी युवा ग्रुप, तसेच समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ देडगाव विशेष परिश्रम घेत आहेत.

