सोनई (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनैश्चर अमावस्येच्या पवित्र पर्वावर सुमारे चार लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले. शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी सुरू झाली होती. संभाव्य गर्दी आणि वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन श्री शनैश्वर देवस्थानच्या प्रशासनाने दर्शन व्यवस्था, वाहनतळ, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि उन्हापासून बचावासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या.
शनैश्चर अमावस्येनिमित्त राज्यासह देशाच्या विविध भागांतून भाविक शनिशिंगणापूर येथे दाखल झाले. मध्यरात्रीपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थान प्रशासनाने नियोजन केले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या आरतीचा मान सौरभ बत्रा आणि रेमंत मारवा यांना मिळाला. सकाळची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाली. दुपारची आरती राहुल गोडसे आणि जयेश शहा यांनी केली. सायंकाळची आरती नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे आणि संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाली.
यावेळी न्यायमूर्ती शिवाजी कचरे, राजस्थानचे राज्यमंत्री के. के. बिष्णोई, राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार नारायण कुचे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, मराठा महासंघाचे संभाजीराजे दहातोंडे आणि पोलीस पाटील ॲड. सयाराम बानकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
अमावस्येच्या दिवशी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शनमार्गावर गार पाण्याचे तुषार फवारण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि रांगेतील प्रतीक्षा सुसह्य व्हावी, यासाठी वाहनतळ, मुख्य दर्शनमार्ग तसेच रस्त्यांवरील विविध ठिकाणी मंडप उभारण्यात आले होते. उन्हामुळे फरशी तापून भाविकांचे पाय पोळू नयेत, यासाठी फरशीवर पांढरा रंग देण्यात आला होता. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र आणि देवस्थानच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता यासाठी अहिल्यानगर पोलीस दल तसेच शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहनांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली होती. घोडेगावकडून येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानच्या दवाखान्याजवळ, संभाजीनगरकडून येणाऱ्या भाविकांसाठी जोगेश्वरी मिसळजवळ, तर शिर्डीकडून येणाऱ्या भाविकांसाठी मुळा कारखाना गेस्ट हाऊसजवळ वाहनतळ उभारण्यात आले होते. या व्यवस्थेमुळे भाविकांच्या वाहनांचे नियोजन करण्यास मदत झाली. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन आणि भाविकांच्या सुविधांचे नियोजन करण्यात आले. जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी भाविकांचे स्वागत केले.

