कोजागिरी… म्हणजे काय? काय आहे कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, जाणून घ्या सविस्तर

संपादकीय

वैदिक पंचांगानुसार आज कोजागिरी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. शरद ऋतूतील आश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्रदर्शन, लक्ष्मीपूजन, चंद्रप्रकाशात दूध ठेवणे आणि रात्रभर जागरण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. मात्र, कोजागिरीच्या रात्री जागरण का केले जाते, त्यामागील धार्मिक महत्त्व काय आणि देवी लक्ष्मीशी या परंपरेचा संबंध कसा जोडला जातो, याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

कोजागिरी…म्हणजे नेमकं काय? या शब्दाचा अर्थ काय?

कोजागिरी या शब्दाचा अर्थ अनेकांना माहित नसतो, खरं सांगायचं तर ‘कोजागिरी’ हा शब्द संस्कृतमधील ‘को जागर्ति?’ या प्रश्नाशी जोडला जातो. याचा अर्थ ‘कोण जागे आहे?’ असा होतो. पारंपरिक धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि कोण जागे आहे, हे पाहते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या रात्री जागरण करून देवीचे स्मरण करणाऱ्या भक्तांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा आशीर्वाद मिळतो, अशी लोकमान्यता आहे.

देवी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व का आहे?

धार्मिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री अनेक भाविक देवी लक्ष्मीची पूजा करतात. घरात दिवे लावणे, फुलं अर्पण करणे, लक्ष्मी स्तोत्राचे पठण करणे, मंत्रजप आणि भजन करणे अशा धार्मिक विधींचे आयोजन केले जाते. काही कुटुंबांमध्ये रात्री उशिरापर्यंत जागरण करून देवीची आराधना केली जाते. या परंपरेमागे देवीप्रती श्रद्धा व्यक्त करणे आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करणे, हा मुख्य भाव असतो.

कोजागिरी पौर्णिमा 2026 :

कोजागिरी पौर्णिमा – रविवार, 25 ऑक्टोबर 2026

लक्ष्मीपूजनाचा निशीथ मुहूर्त – रात्री 11:54 ते 26 ऑक्टोबरच्या पहाटे 12:44 पर्यंत

चंद्रोदयाची वेळ – सायंकाळी साधारण 5:25 वाजता
पौर्णिमा तिथी समाप्त – सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:41 वाजता

चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची परंपरा का पाळली जाते?

धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पूर्ण तेजाने चमकत असल्याने चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व दिले जाते. या रात्री मसाला दूध किंवा खीर चंद्रप्रकाशात ठेवण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी दूध चंद्राला अर्पण करून नंतर प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. चंद्रकिरणांना अमृतासमान मानण्याची धार्मिक श्रद्धा या प्रथेशी जोडली गेली आहे. मात्र, चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधामुळे विशेष आरोग्यास लाभ होतो, अशी मान्यता आहे.

धार्मिक मान्यता आणि लोकपरंपरेनुसार, कोजागिरीच्या रात्री अनेक कुटुंबे एकत्र येऊन भजन, कीर्तन, मंत्रजप, प्रार्थना आणि धार्मिक कथांचे श्रवण करतात. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दूध किंवा खीर प्रसाद म्हणून वाटली जाते. त्यामुळे या उत्सवाला धार्मिक महत्त्वाबरोबरच कौटुंबिक एकोपा आणि सामाजिक आनंदाची जोड मिळते.