चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मुठभर धान्य व घोटभर पाणी उपक्रम        

आपला जिल्हा

जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी व तसेच उपक्रमशील शाळा म्हणून नावाजलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये पशुपक्ष्यांसाठी मुठभर धान्य व घोटभर पाणी हा उपक्रम राबवला गेला. सध्या उन्हाची दाहकता वाढत आहे. या कडक उन्हामध्ये पशुपक्षी संकटात सापडत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी व आपली तहान भागवण्यासाठी पक्षाची अविरत धडपड सुरू असते. या पक्षांच्या धडपडीला सुसह्य करून त्यांच्या जीवाला थोडासा गारवा देण्यासाठी गरज आहे. मूठभर धान्याची व वाटिभर पाण्याची… या उन्हाच्या प्रखर झळामध्ये पक्षाच्या जगण्यासाठीची ससेहेलपट थांबवण्यासाठी, निसर्गातील छोटे पक्षी पाण्याविना मृत होऊ नये , जैवविविधतेला धोका पोहोचू नये म्हणून “मुठभर धान्य व घोटभर पाणी पक्ष्यांसाठी “हा उपक्रम राबवला असल्याची माहिती स्कूलचे प्राचार्य रवींद्र गावडे सर यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या अंगी भूतदया व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अंगी बनवण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. आपल्या शाळेचा परिसर निसर्गरम्य असून शाळेच्या परिसरामध्ये भरपूर प्रमाणात झाडे व झुडपे आहेत. त्यामुळे शाळेच्या परिसरात भरपूर पशुपक्षी वास्तवास असतात. त्यांच्या चोचीला अन्न पाणी मिळावे व पर्यावरणाचा समतोल राहावा, हा आमचा उद्देश आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे सर यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनीही भरपूर प्रमाणात तांदूळ, गहू, बाजरी व ज्वारी धान्य आणले होते व तसेच पाण्यासाठी प्लास्टिक भांडे तसेच खापरी भांडे आणून स्वतःच्या हाताने शाळेच्या परिसरातील झाडाला टांगले व त्यात पाणी भरून ठेवले.
शाळेच्या परिसराबरोबरच आपल्या घराच्या अंगणात गच्चीवर शेतातील झाडांमध्येही पशु पक्षांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्याचा व तसेच हा संदेश शाळा व पंचक्रोशीतील खेड्यांमध्येही पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी उमा कुमावत, रेणुका गोरे, छाया लालझरे, नीता परदेशी, सुप्रिया लिंबे, मीनाक्षी तांबे, छाया निकम, संजय गरुटे, शाहरुख सय्यद, निलेश निधाने, कैलास तांबे, अशोक मगर ,विजय साळुंके यांनी परिश्रम घेतले.