संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील लष्करातील हवालदार रामदास साहेबराव बढे यांना जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. आज, बुधवारी (ता.२६) त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
रामदास साहेबराव बढे लष्कराच्या ३४ एफडी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. तंगधार सेक्टरमध्ये सोमवारी (ता.२४) कर्तव्य बजावत असताना रामदास बढे यांना वीरमरण आले. आज सकाळी त्यांचे पार्थिव मेंढवन येथे आणण्यात आले. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट व पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद रामदास बढे अमर रहें’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मुलगा ऋषिकेश व भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, निलम खताळ, मैथिली तांबे, लष्कराच्यावतीने मेजर आर.व्ही.राठोड, तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद बढे यांना श्रद्धांजली वाहिली.