जनशक्ती (वृत्तसेवा)- देशभरातील नाथभक्तांचे श्रद्धास्थान असलेले पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड (मढी ) ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) असा ३.६ किलोमीटर लांबीचा रोपवे महायुती सरकारने मंजूर केला आहे. या कामासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांचा निधीही सरकारने मंजूर केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय रोप-वे कार्यक्रम पर्वतमाला’ ची घोषणा करण्यात आली होती. त्या योजनेच्या अनुषंगाने श्री क्षेत्र मढी ते मायंबा रोपवेचे काम मंजूर झाल्याची माहिती, आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर असून चैतन्य कानिफनाथ मंदिरापासून जवळच श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या दोन्ही ठिकाणी राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. कानिफनाथ गड ते मच्छिंद्रनाथ गड हे गर्भगिरीच्या पर्वतमय डोंगर रागांच्या परिसरात अतिशय निसर्गरम्य वातावरणात वसलेली देवस्थाने आहेत. दोन्ही देवस्थानच्या गडांना जोडणारा डोंगर रस्त्याचे अंतर नऊ किलोमीटर आहे. परंतू हवाई अंतर ३.६ किलोमीटर आहे. या उपक्रमामुळे भाविकांचे वेळेची बचत होवून पर्यटनाला चालना मिळणार आहे. या रोपवेच्या कामास राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला योजनेअंतर्गत शासनाने तत्वत: मान्यता मिळाली आहे. या कामास मंजूरी मिळणेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु होता. मागील महिन्यात मच्छिंद्रनाथ गड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असतांना या कामाची मागणी त्यांचेकडे केली होती. त्यावेळीच रोपवेचे काम लवकरच मार्गी लागेल, असे त्यांनी आश्वसीत केले होते. रोपवेच्या या कामास मंजूरी मिळाल्याबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
