खूशखबर! महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस बरसणार 

महाराष्ट्र

जनशक्ती (वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०३ टक्के होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये ५ टक्क्यांची वाढ किंवा घट होऊ शकते. जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.‘ला निना’ या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्याऱ्या ‘एल-निनो’ची शक्यता नाकारली आहे. ‘एल-निनो’ फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ‘ला निना’ कमकुवत असणं आणि ‘एल-निनो’ प्रभावी नसल्याने मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो. हिंदी महासागरातील स्थिती ‘एल-निनो’ प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
‘एल-निनो’शिवाय इतर घटक मान्सूनवर परिणाम करतात. आयओडी (इंडियन ओसियन डायपोल) सध्या प्रभावहीन असून यामुळे मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. एलनिनो दक्षिणी दोलन आणि आयओडी दोन्ही मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करतात. चार महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो. जून महिन्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडू शकतो. या महिन्यात १६५.३ मिमी पावसाची नोंद होईल. जुलै महिन्यात २८०.५ मिमी पावसाची नोंद होईल, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०८ टक्के पाऊस होऊ शकतो. या महिन्यात २५४.९ मिमी पाऊस होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पावसाची नोंद होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.