जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील १९७६ पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी २६ गावांच्या कृती आराखड्यास ५३ कोटींची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबत लक्षवेधी केली होती. नेवासा मतदारसंघातील पुनर्वसित गावाचे परत मूल्यमापन करून कृती आराखडा तयार करावा, यासाठी मागणी केली होती. सुरुवातीला हा आराखडा तयार केला. त्यावेळी ५० वर्षांपूर्वीच्या पुनर्वसित गावांना वगळण्यात यावे, असा निर्णय होणार होता. याबाबत आमदार लंघे पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन १९७६ पूर्वीच्या गावांना यातून वगळू नये, अशी मागणी केली. याची दाखल घेत हा आराखडा दुरुस्त करून १९७६ पूर्वीच्या गावांचा यात समावेश करण्यात आला. यामुळे २६ गावांत अपूर्ण असलेल्या सर्व नागरी सुविधांची कामे पूर्ण होणार आहेत. अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, पथदिवे यांचा यात समावेश असणार आहे.आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे १९७६ पूर्वीच्या बहिरवाडी, फत्तेपूर, प्रवरासंगम, खलाल पिंपरी, बकू पिंपळगाव, मंगळापूर, खेडले काजळी, तरवडी, उस्थळ दुमाला, भालगाव, धामोरी, गळनिंब, गोपाळपूर, रामडोह, सुरेगाव गंगा, जैनपूर, रामडोह, सुरेगाव दही, खामगाव, वरखेड, उस्थळ खालसा, बेलपांढरी, बोरगाव, बोधेगाव या गावांचा कृती आराखड्यात समावेश झाला आहे.
