मुळा कॅनॉलला तातडीने पाणी सोडण्याची मागणी; अन्यथा १७ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलनाचा इशारा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा धरणामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून धरणातील अतिरिक्त पाणी मुळा कॅनॉलमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. याबाबत कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर यांना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास १७ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. १७ ऑगस्टपर्यंत पाणी सोडण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाने दिले आहेत.
रस्तापूर, चांदा, कौठा, पाचुंदा, माका, महालक्ष्मी हिवरे, तेलकुडगाव देडगाव आणि अमरापूर या परिसरात यंदा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. परिणामी शेतातील खरीप पिके करपू लागली असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अनेक भागांमध्ये मका, बाजरी, सोयाबीन,कपाशी,तुर तसेच इतर पिकांना पाण्याअभावी फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सध्या मुळा धरणात समाधानकारक जलसाठा असून ओव्हरफ्लो होणारे पाणी मुळा कॅनॉलमार्फत शेतीसाठी उपलब्ध करून दिल्यास हजारो एकर क्षेत्राला दिलासा मिळू शकतो, असे शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले. “शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर पिके वाळत आहेत आणि दुसरीकडे धरणातील पाणी नदीत सोडले जात आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या निवेदनावर भगवान गंगावणे , माणिकराव होंडे, मच्छिंद्र म्हस्के, लक्ष्मण पांढरे, सुरेशराव डिके ,गोरख घुले, प्रा. स्वरूपचंद गायकवाड, संजय पवार, मल्हारी सांगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभाग कोणता निर्णय घेतो, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.