माका महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ब्रेकिंग न्यूज

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- माका येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य निवृत्ती मिसाळ होते.

प्राचार्य निवृत्ती मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली.

विद्यार्थ्यांमधून एफ.वाय.बी.ए.चा विद्यार्थी शिवतेज सोनवणे आणि एस.वाय.बी.एस्सी.ची विद्यार्थिनी सानिया शेख यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापकांमधून प्रा. दत्ता कोकाटे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी प्राचार्य निवृत्ती मिसाळ यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसह विविध क्रांतिकारक व समाजसुधारकांच्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाच्या विकासात युवकांची भूमिका याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केलेला त्याग आणि बलिदान लक्षात ठेवून संविधानिक मूल्ये, बंधुता, समता व सामाजिक बांधिलकी जपण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याची आहे, असे प्राचार्य मिसाळ यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल दहातोंडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.