तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर गायडन्स सेशन उत्साहात

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये करिअर गायडन्स सेशन उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी योग्य दिशा मिळावी, तसेच त्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि अभ्यासातील कार्यक्षमता वाढावी, या उद्देशाने तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे या करिअर गायडन्स सेशनचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्गदर्शन सत्रासाठी जिजामाता सीनियर कॉलेजचे प्राध्यापक गणेश बोरावके व प्राध्यापक संतोष शेळके प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व स्मृती सुधार तंत्र या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्राध्यापक गणेश बोरावके यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधी, योग्य करिअर निवडताना घ्यावयाची काळजी, स्वतःची आवड व क्षमता ओळखण्याचे महत्त्व तसेच ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळविण्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या कौशल्यांचा विकास करावा, बदलत्या काळानुसार उपलब्ध होणाऱ्या विविध शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती घ्यावी आणि आत्मविश्वासाने आपल्या भविष्याची वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
प्राध्यापक संतोष शेळके यांनी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती सुधारण्याच्या विविध तंत्रांची माहिती दिली. अभ्यास केलेला विषय दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी नियमित उजळणी, आकलनपूर्वक अध्ययन, मुद्देसूद नोंदी तयार करणे, महत्त्वाच्या संकल्पनांचा परस्पर संबंध जोडणे आणि नियमित सराव करणे यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. तसेच एकाग्रता वाढविणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि परीक्षेच्या काळातील तणावावर मात करणे याबाबतही त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडीविषयी नवी दृष्टी मिळण्यासोबतच अभ्यास अधिक प्रभावीपणे कसा करावा, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, ध्येय निश्चित करण्याची प्रेरणा मिळते आणि उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करण्यास मदत होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सातत्याने विविध शैक्षणिक व मार्गदर्शनपर उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामागे संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम, संचालिका शुभांगी कदम मॅडम, समन्वयक कल्पना पवार मॅडम, प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक आणि उपप्राचार्य मयुरी आढाव यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.