सेवापूर्तीनिमित्त प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांच्या कार्याचा गौरव   

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त कृतज्ञता व गौरव समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉ. चोपडे यांच्या कार्याचा यावेळी विविध मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत आढावा घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ होते.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी डॉ. भानुदास चोपडे यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थाविकासातील उल्लेखनीय योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. कोरोना काळात महाविद्यालयाचे प्रभावी नेतृत्व, विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी, प्रवेशवाढीसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, महाविद्यालयातील पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केलेला पाठपुरावा, शिक्षकांना उच्च शिक्षणासाठी दिलेले प्रोत्साहन तसेच शैक्षणिक गुणवत्तेच्या वृद्धीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. डॉ. चोपडे यांनी आपल्या दूरदृष्टी, कार्यतत्परता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाविद्यालयाला प्रगतीची नवी दिशा दिली असून त्यांचे कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असे गौरवोदगार त्यांनी काढले.

यावेळी डॉ. अमोल दहातोंडे, प्रा. दत्ता कोकाटे आणि प्रा. मंदार कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. चोपडे यांच्या कार्यनिष्ठा, साधेपणा, माणुसकी, सहकार्याची भावना आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या नेतृत्वशैलीचा गौरव केला. शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलेला आत्मविश्वास, विद्यार्थ्यांविषयी असलेली आत्मीयता आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली अथक मेहनत यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

डॉ. भानुदास चोपडे यांनी आपल्या मनोगतातून  शैक्षणिक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. राहुरी येथे वाणिज्य विषयाचे अध्यापन करताना मिळालेल्या अनुभवांचा, सोनई महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे अध्यापन करताना व परीक्षा विभागात जवळपास ३० वर्षे जबाबदारीने केलेल्या कार्याचा तसेच माका महाविद्यालयात सहा वर्षे प्राचार्य म्हणून कार्य करताना आलेल्या विविध अनुभवांचा त्यांनी उल्लेख केला. या संपूर्ण प्रवासात संस्थेचे पदाधिकारी, सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मिळालेले सहकार्य हीच आपल्या यशाची खरी ताकद असल्याचे सांगत त्यांनी सर्वांविषयी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ यांनी डॉ. भानुदास चोपडे यांच्या कार्याचा आदर्श पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी डॉ. चोपडे यांची शिस्तप्रियता, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा यांचे कौतुक करत त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी, निरामय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शहाबाज सय्यद यांनी केले. अध्यक्षीय सूचना प्रा. मोनाली गायके यांनी मांडल्या, तर त्यास प्रा. चेतन सोनवणे यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. प्राजक्ता गायके यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या सेवापूर्ती समारंभास मुळा एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील, माजी सभापती सुनिताताई गडाख, उपाध्यक्ष उदयनदादा गडाख पाटील, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख तसेच प्रशासन अधिकारी जालींदर घुले (मामा) यांनी डॉ. भानुदास चोपडे यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, हितचिंतक तसेच परिसरातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात कृतज्ञता, आदर आणि भावनिक वातावरण अनुभवायला मिळाले.