प्रा. वसंत पुंड यांना पीएच.डी. पदवी प्रदान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून श्री. वसंत लक्ष्मण पुंड यांना मराठी विषयातील “दिनेश काळे यांच्या साहित्यातील महानगरीय जीवन जाणिवा” या संशोधन विषयासाठी पीएच्.डी. पदवी बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदान करण्यात आली. श्री. वसंत पुंड यांनी हे संशोधनकार्य गांधी महाविद्यालय, कडा येथील मराठी विभाग प्रमुख, प्रो. डॉ. अनिल गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. त्यांनी दिनेश काळे यांच्या कथा, कादंबरी व नाटक या साहित्यातील महानगरीय जाणिवांचा अभ्यास केला. मुंबई महानगरातील सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय नोकरदार यांच्या संवेदना, मूल्यऱ्हास, असुरक्षितता, उपरेपणा, संघर्ष, मेटाकुटीला आलेले जीवन, अहोरात्र कष्ट करूनही पोट भरत नाही हे वास्तव मांडले. त्यांचे हे संशोधन कार्य नवोदित अभ्यासकांना दिशादर्शक ठरेल.
डॉ. वसंत लक्ष्मण पुंड यांनी याअगोदर मराठी आणि इतिहास या विषयांत एम.ए., तसेच शिक्षणशास्त्रात एम.एड. आणि एम.फिल. या पदव्या संपादन केल्या आहेत. त्यांनी मराठी आणि शिक्षणशास्त्र या विषयांतील राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) उत्तीर्ण केल्या असून मराठी विषयातील राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) देखील उत्तीर्ण केली आहे. याशिवाय त्यांनी मराठी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली असून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET Paper-II), महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET-I व TET-II) आणि शालेय व्यवस्थापनातील डिप्लोमा (DSM) या पात्रताही मिळवल्या आहेत. विविध विषयांतील या शैक्षणिक पात्रतांमुळे अध्यापन, शैक्षणिक प्रशासन, संशोधन पद्धती, मूल्यमापन, सांख्यिकी आणि मराठी साहित्याच्या अभ्यासातील त्यांची शैक्षणिक बैठक अधिक भक्कम झाली आहे. अध्यापनाचा अनुभव आणि संशोधनाची आवड यांचा समन्वय साधत त्यांनी शिक्षणक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पीएच्. डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल श्री. वसंत पुंड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या यशाबद्दल प्रा. वसंत पुंड यांचे ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, मा. नामदार शंकरराव गडाख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिता गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, त्यांचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. निवृत्ती मिसाळ, प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे, विद्यार्थी, सहकारी, मित्र परिवार व इतर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. वसंत पुंड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.